
विनोबा भावे


विनोबा भावे भारतरत्न आचार्य विनोबा भावे हे मूळचे वाईचे. सवाई माधवराव पेशवे यांनी ११ जून १७८० रोजी माधव शिवाजी भावे यांना वाई येथे १० एकर जमीन दिल्याने, भावे कुटुंब कोकणातून वाईत आले व स्थिरावले. नरसिंग कृष्णराव भावे हे दुसऱ्या बाजीरावाच्या पदरी सरदार होते. कुलाबा (आजच्या रायगड जिल्हा) येथील आंग्रे सरदारांनी ‘सरकारात बहुत उपयोगी पडले’ म्हणून ‘कृपाळू होऊन कुटुंबाच्या बेगमीसाठी’ १८०७ साली गागोदे बुद्रुक (ता.पेण, जि.कुलाबा) हे गाव इनाम दिले. अर्थात भावे कुटुंब काही काळ गागोदे येथेही राहत होते. त्यामुळे विनोबांच्या जन्म ११ सप्टेंबर १८९५ रोजी गागोदे येथे झाला.
विनोबांचे वडील नरहर भावे हे बडोदा येथे गायकवाड सरदारांकडे नोकरीला लागल्याने १९०५ साली विनोबा बडोद्याला आले. इंटरपर्यंतचे त्यांचे शिक्षण बडोदा येथे झाले. इंटरला असताना २५ मार्च १९१६ रोजी, विनोबांनी गृहत्याग केला व ते काशीला आले. तेथून गांधीजीशी पत्र-व्यवहार करून, ७ जून १९१६ रोजी ते गांधीजींकडे अहमदाबाद जवळील कोचरब आश्रमात आले. पुढे २१ जानेवारी १९१७ ला विनोबा, स्वास्थ, स्वाध्याय व सेवा हा त्रिसूत्री कार्यक्रम घेऊन, आपल्या मूळ गावी वाई येथे आले. येथे त्यांनी दहा महिन्यांत स्वामी केवलानंद सरस्वतींकडे (पूर्वाश्रमीचे नारायणशास्त्री मराठे) वेदान्तासह उपनिषदे, गीता, ब्रह्मसूत्रे, शांकरभाष्य, मनुस्मृती, पातंजल योगदर्शन, वैशेषिक सूत्रे, याज्ञवल्क्य स्मृती इत्यादी ग्रंथांचे अध्ययन केले व पुन्हा गांधीजींच्या आश्रमात परतले. ८ एप्रिल १९२१ रोजी म. गांधींच्या आदेशानुसार, सत्याग्रहाश्रमाच्या संचालनार्थ वर्धा येथे आले.
वर्धा येथे असतानाच त्यांनी १९२३, १९३२, १९४० व १९४२ साली स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन तुरुंगवास सोसला. १९४०च्या व्यक्तिगत सत्याग्रहात, गांधीजींनी त्यांची प्रथम सत्याग्रही म्हणून निवड केली. याच काळात ६ फेब्रुवारी १९३१ रोजी, विनोबांनी अवघ्या चार महिन्यात गीतेचा समश्लोकी मराठी अनुवाद ‘गीताई’ नावाने केला व १९३२ साली धुळे तुरुंगात असताना त्यांनी ‘गीता-प्रवचने’ दिली, ही गीता-प्रवचने साने गुरुजींनी लिहून घेतली. अर्जुनाला मोहातून मुक्त करण्यासाठी भगवंतांनी गीता सांगितली असल्याने, गीततेचा मुख्य संदेश ‘मोहमुक्ती’ हाच आहे असे प्रतिपादन विनोबांनी ‘गीता- प्रवचना’त केला आहे. १९२१ साली विनोबा म.गांधींकडे आले व गांधीजींच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९४८ पर्यंत ते गांधीजींच्या ‘आज्ञेत’ राहिले. या २७ वर्षात त्यांनी अध्ययन व अध्यापनाशिवाय जातिअंतासाठी सुरगाव येथे ओला मैला उचलून भंगिकाम केले, १९३२ साली नालवाडी येथे अस्पृश्य-वस्तीत राहिले, १९२८ साली विनोबांच्या हस्ते वर्धा येथील लक्ष्मीनारायण मंदिर अस्पृश्यांसाठी खुले झाले.
अस्पृश्यांना खुले झालेले हे भारतातील पहिले मंदिर आहे. याच काळात त्यांनी एक आण्यात (६ पैशात) जीवनव्यापनाचा प्रयोग केला. यासाठी त्यांनी आठ-आठ तास शेतात मजुरी व सूत-कताई केली. ‘महाराष्ट्र-धर्म’ साप्ताहिक काढून लेखन केले. पुढे यातील लेखांचे ‘उपनिषदांचा अभ्यास’व ‘मधुकर’ ही पुस्तके प्रकाशित झाली. लिपी सुधारणेचे कार्य हाती घेऊन ‘लोकनागरी’ लिपी निर्माण केली. सर्व भाषा ‘देवनागरी लिपीत लिहिल्या जाव्यात असा विचार मांडला. विनोबांच्या प्रेरणेने गोपाळराव वाळूंजकर यांनी मृत गुरांच्या शवच्छेदनाचे व मनोहर दिवाण यांनी कुष्ठसेवेचे काम हाती घेतले. या दोन्ही कामाचे वाळुंजकर व मनोहर दिवाण आद्य-प्रवर्तक ठरले. गांधीजींच्या हत्येनंतर विनोबांनी १५ मार्च १९४८ रोजी, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद, आचार्य कृपलानी, जयप्रकाश नारायण यांच्या उपस्थितीत; ‘शासनमुक्त, शोषणरहित, वर्गविहीन, अहिंसक-समाज-रचने’साठी ‘सर्वोदय-समाजा’ची स्थापना केली.
गणिती सूत्रमय भाषेत विनोबांनी सर्वोदयाची व्याख्या केली - ‘विज्ञान + अध्यात्म = सर्वोदय.’ सर्वोदय विचाराच्या प्रचारासाठी ते देशभरात फिरत राहिले. याचवेळी १८ एप्रिल १९५१ रोजी तेलंगणात पोचमपल्ली येथे त्यांना रामचंद्र रेड्डी यांनी शंभर एकर जमीन दान दिली. येथूनच विनोबाची भूदान-पदयात्रा सुरू झाली. १३ वर्षे विनोबा भूदान मागत देशभर पायी फिरले व त्यांना जनतेने ४७ लाख एकर जमीन दानात दिली.जी जमीन भूमीहीनांना वाटण्यात आली. पृथ्वीला दोन प्रदक्षिणा होईल इतकी मोठी ही तेरा वर्षांची ही भूदान-पदयात्रा झाली. भूदानात मिळालेली ४७ लाख एकर जमीन म्हणजे, एक मॉरिशस देश! या भूदान पदयात्रेच्या वेळी १९ मे १९६० रोजी चंबळचे डाकू विनोबांना शरण आले. स्वामित्व-विसर्जन, मोहमुक्ती व हृदय जोडणे हाच भूदान-ग्रामदाना मागचा माझा मुख्य हेतू आहे, असे विनोबा म्हणत. हृदय-परिवर्तन व विचार-परिवर्तनाने आणि अहिंसक मार्गाने विनोबांनी समाज परिवर्तन करून दाखविले म्हणून, आशियाचे नोबेल मानले जाणारे पहिले ‘मॅगसेस-अवॉर्ड’ विनोबांना देण्यात आले.
विनोबांना ऋग्वेदाच्या ३ हजार ऋचा व ज्ञानेश्वरीतील २ हजार ओव्या कंठस्थ होत्या. संस्कृत, मराठी, हिंदी, उर्दू, अरेबिक याशिवाय भारतातील सर्व भाषा त्यांना येत होत्या. सर्व धर्मांचे साररूप पुस्तके त्यांनी संपादित केलीत. त्यांचे सुमारे १० हजार पृष्ठांचे समग्र वाङ्मय प्रकाशित झाले आहे. १९७० साली त्यांनी पवनार-वर्धा येथील ‘ब्रह्मविद्या मंदिर’ आश्रमात राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विनोबांनी क्षेत्र-संन्यास व ग्रंथ-मुक्ती घेतली. लेखनच नव्हे तर स्वाक्षरी करणेही बंद केले. एक वर्ष मौन स्वीकारले. आहार कमी केला. अखेर देह थकत गेला! ८ नोव्हेंबर १९८२ रोजी त्यांनी प्रायोपवेशन सुरू केले. अन्न-पाणी वर्ज्य करून १५ नोव्हेंबर १९८२ रोजी, दिवाळीच्या दिवशी त्यांनी देह-त्याग केला!! विनोबांचे सारे कार्य, हृदय जोडण्याच्या एकमात्र प्रेरणेने प्रेरित होते. मोहमुक्ती व स्वामित्व-विसर्जनाचा विचार ते सांगत राहिले. विनोबांच्या सर्व विचारांचे सार त्यांनी दिलेल्या ‘जय जगत्’ या मंत्रात आहे. विनोबांच्या जीवनाचे सारे तत्त्वज्ञान या एकाच मंत्रात सामावले आहे. ‘जय जगत्’ हा मंत्र म्हणजे विनोबांच्या संदेश आहे, उपदेश आहे, आदेश आहे. जगाला संदेश, भारताला उपदेश आणि आपल्या अनुयायांना आदेश आहे!
