
पांडुरंग वामन काणे


महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे जन्म दि. ७ मे १८८० ते मृत्यू १८ एप्रिल १९७२ जन्म कोकणातील पेठे तथा परशुराम या गावी झाला. प्राथमिक शिक्षक वडिलांजवळ व शालेय शिक्षण दापोली या गावी झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. (संस्कृत व कायद्याची डिग्री) संस्कृत विद्येचा वारसा मातुल तसेच पैतृक घराण्यांकडून आपोआपच मिळाला होता. त्यात ज्योतिषाचाही अंतर्भाव होता. ते एकपाठी असल्याने शिक्षणातील प्रगती व वाचनाची भूक मोठी असल्याने त्याचा उपयोग पुढे विविध पुस्तके लिहिताना व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र हा पाच खंडात्मक ग्रंथ लिहिताना उपयोग झाला. सन १८९७ ते १९७७ या कालावधीत एकूण २३ ग्रंथ / पुस्तक लेखन केले. त्याबरोबरच १९४८ साली संस्कृत भाषेतील एका ग्रंथांची निर्मिती केली मातृभाषेत म्हणजे मराठी भाषेत सन १९४८ ते १९६७ या कालावधीत एकूण ८ ग्रंथांची निर्मिती केली याशिवाय हिंदी व कन्नड या भाषेतही पुस्तके लिहीली. यासोबत सन १९०४ ते १९६७ या कालावधीत इंग्रंजीत विपुल लेख लिहिले. सन १९०६ ते सन १९६० या काळात मराठी लेखही पुष्कळ लिहीले. इंग्रजी व मराठी भाषेत अनेक पुस्तकांचे परिचय/परीक्षणात्मक लिखाण केले.
कॉलेजमध्ये असताना संस्कृत विषयासंबंधीची जवळजवळ सर्वच पारितोषिके त्यांना मिळाली. पदवी मिळाल्यावर काही वर्षे काणे यांनी संस्कृतचे अध्यापनही केले अर्थात अध्यापनाची आवड असूनही शिक्षणखात्याचा मनमानी कारभारामुळे त्यांनी अध्यापन बंद करून वकिली व्यवसाय करण्याचे ठरविले. त्यांचे वडील श्री. वामन काणे निष्णात वकील होते. आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदेच्या अधिवेशनांच्या निमित्ताने त्यांच्या युरोपभर बराच प्रवास झाला. नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची काणेंना नेहमीच उत्सुकता असे. या प्रवासानंतर व तेथील सामाजिक जीवनाचे निरीक्षण केल्यावर भारतीय समाजाबद्दलची त्यांची मते वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
पाश्चात्त्य राष्ट्रीय गुण म्हणजे सातत्याने उद्योगशील राहणे, चिकाटी, शिस्त, संघटना व सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्ञानलालसा हे होते. त्यावेळच्या पारतंत्र्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणतात हे गुण आपण लवकरात लवकर आत्मसात केले तर भारताला लवकर स्वातंत्र्य मिळेल व ते टिकेल. पाश्चात्त्यांची ज्ञानलालसा व ज्ञानप्रसार यामुळे ते प्रभावित झाले होते याचे कारण त्या देशांत होणारा प्राथमिक शिक्षण, विद्यापीठे, ग्रंथसंग्रहालये, पदार्थसंग्रहालये यांवर होणारा अवाढव्य खर्च यांची काणे विशेषतः नोंद घेतात. त्यांच्या दृष्टीने पाश्चात्त्यांची शिस्त व संघटन हे गुण विशेष महत्त्वाचे. काणे स्वतः जरी आस्तिक होते व ईश्वर धर्म मानत असले तरी समाज विकासाच्या आड येणाऱ्या प्रथा, चालीरिती, अनावश्यक कर्मकांडे बंद व्हायला हवीत याविषयी ते आग्रही होते.
साचेबद्धपणा त्यांना मान्य नव्हता. त्या दृष्टीने ते धर्मशास्त्राच्या अभ्यासाकडे वळाले व धर्मशास्त्राचा इतिहास लिहिण्याचे बृहत काम त्यांनी सन १९३० ते १९६२ एवढ्या प्रदीर्घ काळात पूर्ण केले. त्यांची मते सनातनी नव्हती उलटी ते उदारमतवादी व सुधारक होते. अनेक सामाजिक संस्थांशी ते जोडले गेले होते. उदा., मुंबई विद्यापीठ, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, रॉयल एशियाटिक सोसायटी, मराठी ग्रंथ संग्रहालय, वैदिक संशोधन मंडळ इ. या सर्व संस्थांसाठी त्यांनी बहुमोल योगदान दिले.
१९४७ साली काणे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्या दरम्यान विद्यापीठ प्रशासनात महत्त्वाच्या सुधारणा घडवून आणल्या. कालांतराने ‘धर्मशास्त्र इतिहासांच्या संशोधन’ लेखनासाठी त्यांनी कुलगुरू पद सोडले. त्या अगोदर त्यांना ब्रिटिश प्रशासनाने महामहोपाध्याय पदवीने सन्मानित केले होते. सन १९५३साली राज्यसभेचे खासदार म्हणून त्यावेळेचे देशाचे पंतप्रधान पंडित नेहरूंनी त्यांची विशेषत्वाने नेमणूक केली. परत सन १९६८ मध्ये दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवड केली गेली. परंतु त्यांचे गुरू स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या सांगण्यानुसार धर्मशास्त्राचा इतिहास लिहिण्याच्या कामात त्या पदाचा अडथळा येतोय या कारणामुळे खासदारकीचा राजीनामा दिला. सन १९६२ मध्ये भारतरत्न या सर्वेाच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
धर्मशास्त्राचा इतिहास लिहिताना श्री. काणे यांना शेवटपर्यंत स्वामी केवलानंद सरस्वती प्राज्ञपाठशाळामंडळ, वाई यांचे मार्गदर्शन लाभले. बहुतांश वेळी ते पत्राद्वारे व क्वचित प्रत्यक्ष भेटीदरम्यान. सन १९३१ ते १९५४ या दरम्यान साधारण दीडशेपेक्षा अधिक पत्रांद्वारे असे मार्गदर्शन मिळाले. स्वामींनी श्री. काणे यांच्याबद्दल जे प्रशंसोद्वार व्यक्त केले, त्यानुसार श्री. काणे हे साम्यग्दश व व्यापक ग्रहणधारणसमर्थ अशी बुद्धी व सतताभ्यास इ. गुणांनी युक्त व्यक्ती म्हणजे ‘पण्डितो मेधावि’ आहात असे गौरवपर म्हणाले आहे. या उलट स्वामींविषयी विशेष प्रशंसोद्वार काढतात श्री. पां. वा. काणे म्हणतात स्वामी प्राचीन काळातील वसिष्ठांसारखे तपोनिष्ट व शान्तदान्त ॠषी होते. म. म. पां. वा. काणे यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली.
उदा., एशियाटिकचे आजीव सदस्य, मुंबई विद्यापीठ सिनेटेचे सदस्य, धर्मनिर्णय मंडळाच्या आठव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद, अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या संस्कृत विभागाचे अध्यक्ष, मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू, मराठी संशोधन मंडळाचे अध्यक्ष, लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑॅफ ओरिएन्टल ॲण्ड आफ्रिकन स्टडिज् या संस्थेचे ऑनररी फेलो म्हणून निवड, साहित्य अकादमी पुरस्कार, भारत सरकारतर्फे सर्टिफिकेट ऑफ मेरीट, पुणे विद्यापीठाची डी. लिट पदवी, याबरोबरच भारत सरकारतर्फे संविधानाचे संस्कृतमध्ये रूपांतर करण्यासाठी जी समिती गठित केली होती त्याचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. अशा रीतीने अतिशय कृतार्थ जीवन व्यतीत केल्यावर १८ एप्रिल १९७२ रोजी अनंतात विलिन झाले.
