top of page
Logo_new-removebg-preview.png

नवभारत विषयी

श्रेष्ठ गांधीवादी विचारवंत शंकरराव देव यांनी नवभारत नावाचे मासिक सन १९४७ पासून पुणे येथे चालू केले. तद्नंतर दहा वर्षांनी म्हणजे १९५७ पासून प्राज्ञपाठशाळेकडून हे प्रकाशित होत आहे. गेल्या ७५ वर्षांपेक्षा अधिक वर्षे हे मासिक सुरू आहे. या मासिकाच्या पहिल्या अंकाच्या पहिल्या पानावर श्री. देव यांनी लिहिलेले उद्दिष्ट मोठे विलक्षण आहे. आजही हे उद्दिष्ट वाचनीय, प्रेरणा देणारे, चिंतनीय आणि कृतीप्रवण करणारे राहिले आहे. त्यात असे म्हटले आहे,


‘‘मानवाच्या आणि मानवी संस्कृतीच्या विकासास आणि उन्नतीस पोषक होईल अशा प्रकारे महाराष्ट्रीय जीवनाचा आणि संस्कृतीचा विकास करणे हे या मासिकाचे ध्येय व उद्दिष्ट आहे.’’ या मासिकात छापल्या जाणाऱ्या लेखात कोणत्याही विशिष्ट पंथाला अथवा धर्माला अथवा मताला किंवा वादाला प्राधान्य दिले जात नाही. उच्च प्रकारचे वैचारिक वाङ्मय सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात यावे यासाठी यात लिखाण प्रसिद्ध केले जाते. विवेकवाद, बुद्धिवाद, विज्ञान, धर्मश्रद्धा, सामाजिक इष्ट वा अनिष्ट रूढी, कला या व यासारख्या मानवी जीवनाशी निगडित असणाऱ्या विचारांचा, प्रणालींचा ऊहापोह यात वेळोवेळी केला जातो. उत्तम दर्जाचा दिवाळी अंक हे ‘नवभारत’च्या अंकाचे वैशिष्ट्य ठरले आहे. उत्तम दर्जाचे वैचारिक वाङ्मय प्रसिद्ध करण्याचे व लोकांपर्यंत नेण्याचे प्राज्ञपाठशाळेचे ‘नवभारत’ मासिकामार्फत होणारे काम भविष्यकाळातही चालू राहावे अशी मंडळाची इच्छा आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांचेकडून या मासिकासाठी काही प्रमाणात अर्थसहाय्य अनुदानाच्या रूपात मिळते आहे. अलीकडील काळातील, ‘दृश्यकला, काल, आज आणि उद्या’ या विषयावरील दिवाळी अंकास सर्वोत्कृष्ट विशेषांक म्हणून गौरविले गेले आहे. मराठीतून उच्च दर्जाचे वैचारिक लेखन करणाऱ्या व्यक्तींची संख्या आणि वर्गणीदारांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने कमी-कमी होत आहे, ही अत्यंत चिंतेची बाब मासिक चालविणाऱ्या संचालकांच्या समोर आहे.

bottom of page